भाजपचे सुधीर पाटील यांची पक्षाकडे मागणी, पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार
आरंभ मराठी / धाराशिव
अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी या घटकाचा विचार करून आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासाठी प्रदीर्घ लढा उभारला होता. कर्जमुक्तीसाठी अचलबेट ते सोनारी, अशी पदयात्रा काढली होती. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत केली.अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले.एकंदर आतापर्यंत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्यामुळे मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असून, भाजपने लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे अजून धाराशिव लोकसभेची जागा कोणाला सुटणार याबद्दल निश्चित झालेले नसते तरी भारतीय जनता पक्षाची एकूणच ताकद, जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदारसंघातील गाव पातळीपर्यंत असलेली यंत्रणा, याचा विचार करता ही जागा भाजपकडे यायला पाहिजे. मात्र महायुतीच्या धोरणानुसार ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्याला आम्ही सर्वजण मिळून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
2016 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी सक्रियपणे काम करत असून,त्यापूर्वी शिवसेनेत अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. तेरणा नदी खोलीकरण, गोरगरीबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण आणि राहण्याची, खाण्याची सोय, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आदी कार्यक्रम घेतले आहेत. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे.एकंदर यापूर्वी शिवसेनेत केलेल्या कामाची आणि सध्या करत असलेल्या कामाची पावती म्हणून जनता माझ्यासोबत असून, अनेक गावातून मला लोकसभेला उभे राहावे यासाठी आग्रह केला जात आहे. शेतकरी हा महत्वाचा घटक असून, शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र निवडणुका आल्या की काही नेते 21 टीएमसी योजना समोर आणतात. आजवर सत्ता भोगलेल्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवायला हवा होता. आपण शेतकऱ्यांसाठी पुढच्या काळात पाण्यासह बाजारपेठ, शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी देखील प्रदीर्घ लढा उभारणार आहोत,असे पाटील यांनी सांगितले.
पक्षाकडे मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली असून, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. वेगळी भूमिका घेणार नाही, असे सुधीर पाटील म्हणाले.