प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिवच्या कसदार मातीतून नवा विचार घेऊन आणि सर्वसामान्यांच्या हक्काचं माध्यम अर्थात ‘आरंभ मराठी’ या दैनिकाचा आरंभ शुक्रवारी,प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरंभ मराठीच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ. प. प्रकाश बोधले महाराज उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, डॉ. अभय शहापूरकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सेक्रेटरी डॉ. मीना जिंतूरकर, रोटरीयन रवींद्र साळुंके, माजी नगरसेवक प्रा.खलील सय्यद, ज्येष्ठ नेते धनंजय शिंगाडे, उद्योजक विकास देशमुख, शिवसेनेचे नेते अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा श्री सिद्धिविनायक परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अजित लाकाळ, किशोर गंगणे, ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य, कमलाकर कुलकर्णी, धनंजय रणदिवे,फिजिशीअन डॉ.तानाजी लाकाळ, माहिती अधिकारी काझी, उद्योजक मनोज सुरवसे, पृथ्वीराज गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आरंभ मराठीच्या कार्यालयाचे फीत कापून उदघाटन केले. याप्रसंगी डॉ तानाजीराव यांनी आरंभ मराठीचे संपादक चंद्रसेन देशमुख यांचे आणि आरंभ मराठीच्या संपूर्ण टीमचे शुभेच्छा देऊन आरंभ मराठीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आरंभ मराठी सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता करेल आणि आरंभ मराठीची भरभराट होईल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले. वर्तमानपत्र चालवणे हे आज खूप कठीण काम आहे तरीही चंद्रसेन देशमुख यांनी हे आव्हान स्वीकारले असून, त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. उद्योजक आणि सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी आरंभ मराठीचे कौतुक केले. आरंभची पत्रकारिता जिल्ह्याला दिशा देणारी असेल, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उद्योजक म्हणून मी सदैव आरंभ मराठीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असा शब्द दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे आणि नेते अनिल खोचरे यांनीही सदैव आरंभच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील यांनी आरंभ मराठीला दिल्या. या सोहळ्याचे अध्यक्ष हभप बोधले महाराज म्हणाले की, पत्रकाराची सिद्धहस्त लेखणी समाज प्रबोधन करत असते. साधूची वाणी आणि पत्रकाराची लेखणी या दोन्हीची ताकद एकत्र आल्यानंतर मोठी क्रांती घडते. जेवणात तुपाचे महत्व असते तसेच महत्व आज पत्रकारितेमध्ये जाहिरातीचे आहे.धाराशिव जिल्ह्यात विविध व्यक्तीमत्वांना व्यासपीठ देण्याचे काम आरंभ मराठी आणि चंद्रसेन देशमुख करतील अशी अपेक्षा बोधले महाराजांनी यावेळी व्यक्त केली.
दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
या प्रकाशन सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , साहित्य, कला,क्रीडा, प्रशासकीय आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, यशदा परिवाराचे अध्यक्ष सुधीर सस्ते, उद्योजक विकास देशमुख, डॉ तानाजी लाकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वाचक, विक्रेते, जाहिरातदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर आभार आरंभ मराठीचे प्रतिनिधी सज्जन यादव यांनी मानले.