धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार वरिष्ठ वकील देणार, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / धाराशिव
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकेत धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकीलांसह जेष्ठ विधिज्ञ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर तुळजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या भव्य स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्यासोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत तसा निर्णय झाला असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धनगर आरक्षण व समाजाच्या इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुषंगाने मंगळवारी नागपूर येथे विधान भवनात त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,धनगर समाजाचे नेते बाळासाहेब खांडेकर अरविंद पाटील,राम जवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत धनगर समाजाला आरक्षणच देण्याचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असल्याने यात समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील व त्यांच्या जोडीला नामांकित जेष्ठ विधीज्ञ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.तुळजापूर येथे देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात.तुळजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पूर्णाकृती पुतळा असलेले भव्य असे स्मारक उभे केले तर त्याच्या माध्यमातून देशविदेशातील नागरिकांना अहिल्यादेवींचा इतिहास माहिती होईल त्यामुळे तुळजापूर येथे स्मारक उभारण्याबाबत देखील चर्चा झाली.
नियोजित स्मारकासाठी शासकीय विश्रामगृहाची जागा देण्यासाठी कायदेशीर अडचणी येत असून, नगरपालिकेकडे सदर जागा हस्तांतरित केली तर ती अडचण दूर होईल ही बाब आ.पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच स्मारक भव्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.