कुलदीप नंदूरकर, नांदेड
मराठवाडा भाग शेती आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो. इथं नित्यनियमाने सोयाबीन, गहू, ज्वारी, कापूस अशी पारंपरिक पिके घेत नांदेड जिल्ह्यात शेती केली जाते. ऐन पीक काढणीच्या वेळी आयात निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो ही तर गोष्ट आता वर्षानुवर्षे पाचवीलाच पुजलेली आहे. यंदा मात्र नांदेड जिल्ह्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग करीत स्वतःचा एक नवा हमरस्ता तयार केलाय.
नांदेड जिल्ह्यातील बारड येथील शेतकऱ्याने नवी शक्कल लढवित स्ट्रॉबेरी या पिकाचे उत्पादन घेतलं तर शहापूर येथील एका तरुण शेतकऱ्याने धने या मसालावर्गीय पिकाचे उत्पादन घेत आगळा प्रयोग केला आहे.
या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या नव्या प्रयोगाची आणि जिद्दीची गोष्टच सगळ्यांना सुखावणारी आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर या गावातील भूमरेड्डी या तरुण शेतकऱ्याने धने या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतलं आहे. मुळात खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड अनेक वर्षांपासून या भागात केली जाते. एकच एक पीक घेतल्यामुळे शेतीचा पोत खालावतो आणि परिणामी पुढच्या पिकावर आणि होणाऱ्या उत्पादनावर परिणाम होतो. पीक कमी होतं. या नेहमीसाठी समस्येला तोंड देण्यासाठी या शेतकऱ्याने रब्बी हंगामात ‘धने’ या मसालावर्गीय पिकाचे उत्पादन घेतलं. यंदा हा प्रयोग पूर्णतः यशस्वी देखील झाला आहे.
भूमरेड्डी सांगतात, यंदा १५ एकर शेतात धने पिकाचं उत्पादन घेतलं आहे. खरं म्हणजे या पिकाला आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यात मोठी मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या तेलंगणा सीमेवरील शहरात धन्याच्या खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट आहे, तिथूनच हा सगळा मला परराज्यात पाठवला जातो.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्र या शेतीसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या केंद्रातून धने या पिकासंबंधी मार्गदर्शन मिळाले असे भुमरेड्डी सांगतात.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला रानडुक्कर, हरीण, उंदीर असे कोणतेही प्राणी खात नाहीत. वन्यजीव प्राण्यांमुळे पिकांचे जे नुकसान होते ते होत नाही ही अत्यंत जमेची बाजू आहे.
साधारणपणे १३ हजार रुपये क्विंटल या भावाने धने या पिकाचं बियाणं मिळतं, दरवर्षी दोन वेळेस हे पीक घेता येते, तीन महिन्यांच्या कालावधीत हे पीक काढणीला येते यामुळे अल्पावधीतच मिळकत देणारं हे पीक आहे. ऑक्टोबर आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यात हे पीक घेता येतं. एका हंगामात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तीन वेळेस स्प्रेच्या साह्याने फवारणी करावी लागते. आणि उत्पादन वाढवण्यासाठी दोन वेळेस पाणी द्यावे लागते. एवढी मेहनत आणि गुंतवणुकीशिवाय अन्य कसलाच खर्च नाही, असेही या भुमरेड्डी यांनी सांगितलं.
सध्या बाजारात धने प्रति क्विंटल १० हजार रुपये भाव आहे. त्यामुळे एक एकरात ७ क्विंटल असे भरघोस उत्पादन देणारं हे पीक आहे. म्हणून सध्यातरी नांदेड जिल्ह्यातील शहापूर या भागात धने उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी या मसालावर्गीय पिकातून भरघोस उत्पन्नाचा राजमार्ग निर्माण केलाय.