प्रतिनिधी / धाराशिव
आत्मा विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा अंतर्गत धाराशिव तालुक्यातील कारी येथे गोगलगाय नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात आली. आत्मा विभागा मार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी व गोगलगाय नियंत्रण कसे करावे, याविषयीचे प्रात्यक्षिक एन.पी.उगलमुगले यांनी दिले. हे प्रात्यक्षिक सोयाबीन उत्पादक शेतकरी परीक्षितराजे विधाते यांच्या शेतातील बांधावर जाऊन चुन्याची फक्की काढून करून दाखवण्यात आले.
उगमुगले यांनी शेतकऱ्यांना चुन्याच्या फक्कीवरून गोगलगायी गेल्यानंतर तिच्या शरीरातील पाणी बाहेर पडते, त्यानंतर ती मरण पावते,हे सांगितले. शिवाय याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. चुन्यामुळे गोगलगायी नियंत्रणात येऊ शकते. चुन्याचा प्रयोग करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये गोगलगायचे नियंत्रण करणे सोपे झाले आहे. मार्केटमध्ये दहा किलो चुना शंभर ते दीडशे रुपयांमध्ये भेटतो, पाच किलो चुन्यामध्ये एक हजार फूट फकी ओढता येते. चार इंची फकी ओढावी, सोयाबीन प्लॉटच्या चारही बाजूच्या बांदाच्या कडेने फक्की ओढावी, गोगलगायीपासून सोयाबीन पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी हा उपाय करावा, असे आवाहन कृषी सहाय्यक नितीन जाधव यांनी केले तसेच त्यांनी कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी परीक्षितराजे विधाते,खासेराव विधाते,अमोल जाधव,उमेश डोके,मामा डोके,राजाभाऊ गादेकर,कलीम मुलाणी,गजानन गंभीर,अविनाश कावळे,बापू वाघे,दत्ता जाधव,तुषार माने,अनिल कदम,असिफ मुलाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.