आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेला आज दोन महिने झाले. अजितदादा गेल्यानंतर त्यांची जागा त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी घेतली. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई जाहीरपणे कधी व्यक्त झाल्या नाहीत. मात्र, आज दोन महिन्यांनी सुनेत्राताई यांनी समाजमाध्यमावर अजितदादांसाठी पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या. सुनेत्राताई यांनी लिहिले आहे की,
दादा,
आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.
तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.
तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.
दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.
भावपूर्ण आदरांजली
अशा शब्दांत सुनेत्राताई व्यक्त झाल्या आहेत.









