विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पोस्ट आणि कुरिअरसारख्या यंत्रणांचाही गुन्हेगार वापर करतात,अशी कबुलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना उत्तरात दिली.मात्र अंमली पदार्थ तस्करीत प्रशासनातील कुणी सापडले तर कलम ३११ चा वापर करून थेट बडतर्फ केले जाईल, असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला. अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा (एनसीबी) तसेच दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) कारवाई करील.संबंधित कायद्यातही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) सदस्य रोहित पवार यांनी नियम-१०५ अन्वये यासंदर्भात लक्षवेधी सूचना दिली होती. व्हॉट्सअॅपवर इमोजी पाठवून, जी-पेद्वारे पैसे पेड करून व्यवहार होतो शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त राज्यात येणारे काही विदेशी नागरिक अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीत गुंतले असून येथील युवा पिढीला ओढले जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार असा सवाल त्यांनी केला.
गृहमंत्री फडणवीस उत्तर देताना पुढे म्हणाले, राज्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पध्दतींचा अवल़ंब केला जातो. पोस्ट, कुरिअर, इंटरनेटवरील डार्कनेटद्वारेही व्यवहार होतात. जलमार्गे अंमली पदार्थ येथे आणले जातात. शासन तस्करी रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना फडणवीस म्हणाले,बंदरांवर उतरणाऱ्या कंटेनरमधील सामानाचे स्कॅनिंग,कुरिअर व्यवहारासाठी नियमावली, पोस्टातील कर्मचा-यांनीही संशयित पार्सलबाबत सावधगिरी बाळगावी याबाबत सुचना देण्यात येत आहेत.अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज प्रतिपादन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंमली पदार्थांची प्रकरणे हाताळण्याचे अधिकार एनसीबीप्रमाणेच ते एटीएसकडेही असावेत. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास वेळ मिळावा यासाठी आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० वरून १८० दिवस करण्यात यावी. अंमली पदार्थांसंदर्भात जी मर्यादा आहे, त्यामध्ये बदल करण्यात यावा. अंमली पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक आढळले तर विक्रीसाठीच आहेत असे कायद्याने सिध्द होते. गांजा २० किलो जवळ बाळगण्याची मुभा होती ती मर्यादा ५ किलोवर आणण्यात आली आहे.तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. औषध विक्रेत्यांनीही संपूर्ण नोंदी ठेवाव्या अशा सुचना दिल्या आहेत.कॉंग्रेस नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, भाजपचे समीर मेघे या सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.