आरंभ मराठी / धाराशिव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महामार्गांवर पोलिसांनी गस्त वाढवली असताना स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तुळजापूर-नळदुर्ग-उमरगा महामार्गावर संशयास्पदरीत्या भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह आयशर वाहन असा एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, वाहनातील दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणात आंतरराज्य टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दिवाळी सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सतर्क राहून पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा परिसरातील महामार्गावर गस्त घालत होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांना एक आयशर वाहन अत्यंत भरधाव वेगाने संशयास्पदरीत्या नळदुर्गच्या दिशेने जाताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले. त्यामुळे वाहनात काहीतरी संशयास्पद असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.
कासार यांनी तातडीने पुढे पेट्रोलिंग करणारे पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन वाहन अडविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गाडेकर यांनी जळकोट येथील निरंजन हॉटेलच्या पुढे आयशर वाहन अडविले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मागील भागात गांजासदृश पदार्थ आढळून आला. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
त्यानंतर शासकीय पंच, न्यायवैद्यक प्रयोगशाळेची व्हॅन आणि मुद्देमालाचे वजन करण्यासाठी तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या चाचणीत हा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. वजन केले असता एकूण १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा व्यावसायिक प्रमाणातील असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी वाहनचालक आकाश दांगट आणि त्याचा सहकारी महादेव जाधव यांना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा गांजा नेमका कोणाकडून आणण्यात आला होता, त्याची वाहतूक कोणासाठी केली जात होती आणि पुढे त्याचा पुरवठा कोणाला होणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तस्करीमागे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यताही तपासली जात आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २५ आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत.
पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार दयानंद गाडेकर, फरहान पठाण, चालक पोलीस हवालदार सुभाष चौरे, पोलीस नाईक अशोक ढगारे आणि चालक पोलीस शिपाई बाबा गुरव यांनी ही कारवाई केली.










