विशेष प्रतिनिधी / मुंबई
माझ्यासह सर्व सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे,आम्ही तिघे पण एकेकाळी विरोधीपक्ष नेते होतो. आता विरोधी पक्षाचे अवसान गळाले आहे,त्यामुळे त्याचे अस्तित्व दिसत नाही,असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे,गुलाबराव पाटील,दीपक केसरकर उपस्थित होते.
राज्यात पाऊस आणि शेतकरी यांची स्थिती हवी तशी चांगली नाही याची मला जाणीव आहे,आम्ही शेतकरी वर्गाच्या पाठीशी मजबुतपणे उभे आहोत,त्यामुळे काळजी करू नका,शेतकऱ्यांना एकटे पाडणार नाही असेही शिंदे म्हणाले. राज्यात 86 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून, उद्योगात राज्य अग्रेसर राहील याची काळजी सरकारने घेतली आहे असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर टीका करताना आपण सरकारला काय पत्र देतो याचे भान विरोधी पक्षाला नाही यातून विरोधी पक्ष कसा भांबावला आहे हे दिसते असे सांगितले.
वर्षभरात या सरकारने विविध आघाड्यांवर भरपूर काम केले आहे,मागच्या काळात अडीच वर्षात केवळ 2 कोटी मुख्यमंत्री सहायता निधी वापरण्यात आला, आम्ही मात्र एका वर्षात या निधीतून 86 कोटी रुपये रुग्णांना वाटले असेही यावेळी सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पर्यंत विरोधी पक्षात केलेल्या कामाचा उपयोग राज्यातील सामान्य जनतेसाठी करणार असल्याचे सांगून विरोधी पक्षाकडून जरी योग्य प्रश्न आले तरी त्याला न्याय करण्याचा प्रयत्न करू असे अभिवचन दिले.
गणवेश मोफत
आठवीपर्यंत सर्वांना मोफत गणवेश देण्यात येणार असून,राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे,शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे असेही यावेळी शिंदे म्हणाले.