आरंभ मराठी / धाराशिव
स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पवनचक्क्यांच्या नवीन विद्युतवाहिनीवरील अॅल्युमिनियम व तांब्याची तार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात केलेल्या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या तारा खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीलाही पकडण्यात आले आहे. या कारवाईत चार गुन्हे उघडकीस आणून तांब्याची तार, अॅल्युमिनियम तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील शाम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदार येरमाळा व वाशी परिसरातील पवनचक्क्यांच्या विविध ठिकाणांहून नवीन विद्युतवाहिनीची अॅल्युमिनियम तार चोरून आणून पिकअप वाहनात भरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मांडवा शिवारात धाव घेतली. तेथे एक पिकअप व दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे, तसेच ८ ते १० इसम पिकअपमध्ये तारांचे बंडल टाकत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला.
पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये शाम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह.मु. मांडवा), आकाश श्रीरंग पवार (रा. वरुडा), पवन कालीदास काळे (वय २२, रा. वरुडा) आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, ता. जि. बीड) यांचा समावेश आहे. यावेळी पळून गेलेल्या अन्य चार इसमांची नावेही आरोपींनी पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी तारांबाबत चौकशी केली असता, तेरखेडा, इंदापूर व ढोकी शिवारातील पवनचक्क्यांच्या नवीन पोलवरील विद्युतवाहिनी कापून तार चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरीच्या तारा धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला विकल्याची माहिती आकाश पवार याने दिली. त्यानंतर पोलिसांनी जाकेर निजाम शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आरोपींकडून चोरीच्या तारा खरेदी केल्याचे सांगितले.
सर्व आरोपी तसेच चोरीच्या तारा खरेदी करणाऱ्या व्यक्तीस येरमाळा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. या कारवाईत चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, तांब्याची तार, अॅल्युमिनियम तार, पिकअप वाहन व दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच क्युआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात, चापोह महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.










