आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हा गुंतवणूक परिषद–धाराशिव २०२६’चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करून आज मार्गदर्शन केले. या परिषदेत तब्बल ३७ उद्योगांसोबत ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशासोबतच कृषी, कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून मोठी औद्योगिक झेप घेण्याची क्षमता आहे. या क्षमतेचा प्रभावी वापर करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही गुंतवणूक परिषद केवळ उद्योगपतींची बैठक नसून धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिक पातळीवर उद्योग उभारणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. परिषदेत होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीकडे केवळ आर्थिक आकडेवारी म्हणून पाहता येणार नाही. या गुंतवणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळू शकते. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच विविध उद्योगांना पूरक व्यवसाय, सेवा आणि रोजगारनिर्मितीला देखील मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले. कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, अक्षय ऊर्जा, पर्यटन आणि एमएसएमई क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे येऊन जिल्ह्यात गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले. उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि धाराशिवमध्ये उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या गुंतवणूक परिषदेसाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष आभार मानले. ७५३४.८५ कोटींची प्रस्तावित गुंतवणूक आणि ७५०० रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट धाराशिवच्या औद्योगिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









