प्रतिनिधी / मुंबई
जवळपास दीड महिन्यापासून मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या बांधवांना शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी रातोरात अटक करून कोठडीत डांबून ठेवले.त्यांच्याकडील गाड्या, साहित्यही उचलून नेले. ही पोलिसांची पर्यायाने सरकारची दडपशाही सुरू झाली आहे, असा आरोप मराठा आंदोलकांनी आणि समाज बांधवांनी केला आहे. दरम्यान, आंदोलकांची सुटका करत मुंबई न्यायालयाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद न करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मात्र समाज बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
तुळजापूर ते मुंबई अशी वनवास यात्रा काढून 6 जूनपासून मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच सरकारकडून मात्र दखल घेतली जात नाही.त्यामुळे राज्यातील समाज बांधवांनी येत्या 17 तारखेला आझाद मैदानावर एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.या पार्श्भूमीवर सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आंदोलक योगेश केदार म्हणाले, आम्हाला पोलिसांनी अचानक अटक मात्र न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली. किंबहुना FIR देखील दाखल करू दिला नाही.न्यायालयाने आझाद मैदानावर मराठा वनवास यात्रा सुरूच ठेवण्याची दिली परवानगी. ॲड .रोहन काकडे व त्यांच्या सोबतच्या सर्व मराठा वकील बांधवांचे मनापासून आभार मानतो. सरकारने दडपशाही सुरू केली असून, येत्या 17 तारखेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी आझाद मैदानावर हजर राहावे,असे आवाहन करतो. वास्तविक पोलिसांनी कोर्टात हास्यास्पद मागण्या केल्या गेल्या. या आंदोलकांमुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. यांना पावसाळी अधिवेशन काळात मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मज्जाव करा. यांच्या या मागणीतून सरकारची मानसिकता दिसून आली. म्हणजे अधिवेशन काळात मराठ्यांची मागणी सभगृहात चर्चेलाच येऊ नये. म्हणजे केवळ राजकीय दबावापोटी आम्हाला उचलले हे स्पष्ट होत होते. आणखीही किरकोळ आरोप सरकारकडून ठेवले गेले पण न्यायालयाने ते अमान्य केले, असे योगेश केदार यांनी सांगितले.
सरकारकडून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न
ओबीसी आरक्षणसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून असलेल्या मराठा वनवास यात्रेतील तरुणांना सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी अचानक आझाद मैदानावरून उचलले. पोलिस ठाण्यात नेऊन एका कोठडीत रात्रभर डांबून ठेवले. आमचे फोन काढून घेऊन घरच्यांना देखील बोलू दिले नाही. आमचा नेमका गुन्हा काय? हेही सांगितले गेले नाही. आम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास देण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला गेला,असा गंभीर आरोप केदार यांनी केला आहे.
गुन्ह्यांची यादी काढून अडकवण्याचा प्रयत्न
योगेश केदार म्हणाले,आम्ही एक महिना आधीपासून आझाद मैदानावर राहत होतो. पण काही दिवसांपूर्वीच छगनराव भुजबळ सत्तेत आले आणि दोन तीन दिवसांपासून आम्हाला अडचणी सुरू झाल्या. एक दिवस आधी आमच्या गाड्या उचलून नेल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला बेकायदेशीररित्या उचलून नेले. जुन्या खोट्या गुन्ह्यांची यादी काढून मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण कुणाचेही काहीही चालले नाही. तसेही गुन्ह्यांना घाबरणारे आम्ही मराठे नाहीत.