आरंभ मराठी / धाराशिव
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रलंबित असलेल्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या भविष्यात याची वाट पाहत होते. दिनांक १३ मार्च रोजी आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त ‘पीएम किसान उत्सव दिवस’ साजरा करण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करणार आहेत. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातीलही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यातही १३ मार्च रोजी पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता जमा होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.









