आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून सुरुवातीच्या दोन तासांत अनेक केंद्रांवर मतदारांची रांग वाढताना पाहायला मिळाली. मात्र काही ठिकाणी मतदानाची गती मंदावल्याचेही चित्र दिसून आले.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदार आज 93 प्रभागांतील 287 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. 8 नगराध्यक्ष पदांसह 183 सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दोन तासांची टक्केवारी जाहीर झाली असून त्यामध्ये भूम नगरपालिकेने सर्वाधिक मतदानाची नोंद केली आहे, तर धाराशिव नगरपालिका सर्वात कमी मतदानावर आहे.
🔹 नगरपालिकानिहाय पहिल्या दोन तासांचे मतदान
धाराशिव – 6.5%
तुळजापूर – 11.96%
मुरूम – 12.91%
कळंब – 8.13%
भूम – 13.55%
परंडा – 10.14%
उमरगा – 9.51%
नळदुर्ग – 10.64%
भूम, मुरूम आणि तुळजापूर या नगरपालिकांमध्ये सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर दाखल झाल्याचे दिसत आहे. तर धाराशिवमध्ये सकाळची गती मंद असली तरी पुढील तासांत मतदानाला वेग येईल, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षा यंत्रणा तैनात असून सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारनंतर मतदारांची वाढती उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया संपूर्ण दिवस सुरू राहणार असून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









