आरंभ मराठी / धाराशिव
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे. मात्र, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने १८ नोव्हेंबर २०२५ ही केवायसी (KYC) पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे.
या तारखेपूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलांना पुढील महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात या योजनेत ३ लाख ८८ हजार महिला लाभार्थी आहेत. मात्र, विविध तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे, आणि पात्रतेच्या निकषांमुळे आतापर्यंत जवळपास ४० हजार महिला योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.
सध्या सुमारे साडेतीन लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनुसार, केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी काही लाभार्थी बाद होण्याची शक्यता आहे. कारण अनेक लाभार्थ्यांची बँक माहिती, आधार लिंकिंग, किंवा राहत्या ठिकाणाचा पुरावा अद्ययावत नाही.
जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थींना आवाहन केले आहे की, १८ नोव्हेंबरपूर्वी जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून योजनेचा लाभ खंडित होणार नाही. दरम्यान, अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, महिला बचतगट आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महिलांना केवायसीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरेही आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, केवायसी प्रक्रिया ही पात्रतेची खातरजमा करण्यासाठी अत्यावश्यक असून, पारदर्शकतेसाठी ही पायरी उचलण्यात आली आहे. सध्या महिनाभरापासून केवायसी करण्याच्या पोर्टलची तांत्रिक समस्या भेडसावत असून, अनेक महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यातच केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत दिल्यामुळे लाभार्थी महिलांच्या हातात केवायसी करण्यासाठी आता केवळ वीस दिवस शिल्लक आहेत.









