आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या महापुराच्या संकटाच्या काळात शिक्षकांनी आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषदचे शिक्षक थेट एक कोटी रुपयांचा निधी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार असून, हा ऐतिहासिक निर्णय आज सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोनाकाळात शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगार जिल्ह्याच्या कोविड खात्यात जमा केला होता. हा निधी न वापरला गेल्याने त्यातून तुळजापूर येथे शिक्षक भवन उभारण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र तो अमलात न आल्याने सध्या जिल्हाभरात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व महापुराच्या भयानक परिस्थितीचा विचार करून शिक्षकांनी संवेदनशीलता दाखवली. पिके वाहून गेलेली, संसार उघड्यावर पडलेले, कर्जाच्या गर्तेत सापडलेले शेतकरी, या विदारक परिस्थितीत शिक्षकांनी आपला निधी सोडून थेट शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे ठरवले.
या निर्णयाला औपचारिक स्वरूप देत शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्याशीही पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. कोविड काळात शिक्षकांनी जमा केलेला निधी तात्काळ पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अशी विनंती सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
या बैठकीस अखिल शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, बिभीषण पाटील, कल्याण वेताळे, रमेश बारस्कर, अभय यादव, पवन सूर्यवंशी, श्री. कदम, चंदन लांडगे, बापू शिंदे, बाळासाहेब घेवारे, तय्यब अली शहा, विकास मुळे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.