आरंभ मराठी / धाराशिव
सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता एकत्रच वितरित करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळू शकले नाहीत. त्यातच काही दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या या उत्सवातच सरकारकडून महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा तीन हजारांचा हप्ता एकदाच वितरित करण्यात येणार आहे.
हा हप्ता कधी वितरित होणार याचा दिवस ठरला नसला तरी घटस्थापनेच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे पैसे वितरित करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे बहिणींच्या हाती एकावेळी दुप्पट रक्कम येणार असून, त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक बहिणीला दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांना या योजनेचा थेट फायदा होत आहे. धाराशिव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 3 लाख 88 हजार महिला लाभार्थी आहेत.
जून महिन्यात यातील काही लाभार्थी महिलांची नावे विविध कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. या योजनेतून एक वर्षात धाराशिव जिल्ह्यातील महिलांना 700 कोटी रुपयांची मदत झाली आहे. दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित वितरित झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना जवळपास 115 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे.
ऐन सणासुदीच्या काळात या पैशांचा महिलांना उपयोग होणार आहे. सरकार हप्ता वितरित करण्याची तारीख कधी जाहिर करते याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.