एकाच दिवशी 47 गाईंची केली सुटका
तीन वाहनासह 17 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरंभ मराठी / धाराशिव
गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दर दोन चार दिवसाला गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर छोट्या-मोठ्या कारवाया केल्या जातात मात्र, तरीही पोलिसांचा वचक राहिला नसून, राजरोसपणे कत्तलीच्या उद्देशाने गाईंची वाहतूक केली जात असल्याचे दिसते.
मंगळवारी (दि.8) एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल 47 गाईंची पोलिसांनी अवैध वाहतूक करताना पोलिसांनी तीन वाहनांवर कारवाई केली. यावेळी 17 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशननी एकाच दिवसात केलेल्या कारवाईत 17 लाख 44 हजार रुपयांच्या किंमतीच्या 47 गाई पकडण्यात आल्या आहेत.
यावेळी पोलिसांनी त्वरित वाहन ताब्यात घेतले आणि गोवंशीय जनावरांची सुटका केली. यातील पहिल्या प्रकरणात बेकायदेशीर गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर वाशी पोलिसांनी कारवाई करून पाच गाईंची सुटका केली.
यातील आरोपी किरण तायाप्पा शिंदे (वय 38 वर्षे, रा. परंडा) हा दिनांक 8 जुलै रोजी इंदापुर शिवारातील भैरवनाथ साखर कारखान्या समोर हायवे रोडवर पिकअप (क्र एमएच 13 डी क्यु 0706) मध्ये गोवंशीय जातीच्या 3 जर्सी गायी 1 खिल्लार जातीची गाय व 1 गिर गाय असा वाहनासह एकूण 3,50,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावरुन वाशी पोलीसांनी ते वाहन जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व गाईंची सुटका केली.
दुसऱ्या प्रकरणात परंडा पोलिसांनी कारवाई करून 26 गाईंची अवैध वाहतूक होताना कारवाई केली. यावेळी पिकअप वाहनात (क्र एमएच 11 बीएल 4409) दिनांक 8 जुलै रोजी वारदवाडी ते भूम या रोडवर वाहनामध्ये गोवंशीय जातीच्या 4 जर्सी गायी आणि 22 वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी 2,10,000 रुपये किंमतीच्या वाहनासह 5,10,000 रुपये किंमतीच्या गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यावेळी परंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिसऱ्या प्रकरणात भूम पोलिसांनी कारवाई करत 16 गाईंची सुटका केली. दिनांक 8 जुलै रोजी रात्रीच्या वेळी
आयशर टेम्पोत (क्र एमएच 13 ए एक्स 3132) मध्ये शासकीय दुध डेअरी भुम येथे गोवंशीय जातीच्या 12 जर्सी गायी आणि 4 वासरे घेऊन जात असताना कारवाई केली. यावेळी 1,84,000 रुपये किंमतीच्या वाहनासह 8,84,000 रुपये किंमतीच्या कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई ताब्यात घेण्यात आल्या.
पोलीसांनी सरकारतर्फे वाशी, परंडा आणि भूम पोलीस ठाण्यात कलम 9, 5 प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(ड),(इ)(ई) (ऐ)(ठ) अन्वये तीन गुन्हे नोंदवले आहेत.
गोवंशीय जनावरांसह गोमांसाच्या वाहतुकीवर नियंत्रण नाही
जिल्ह्यात सर्वत्र गोवंशीय जनावरांसह गोमांसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील आठवड्यात एका वाहनात तब्बल तीन टन गोमांसाची वाहतूक होत असताना धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली होती. धाराशिव शहरातील वैराग रोड परिसरात गोवंशीय जनावरांची राजरोसपणे वाहतूक होत असताना पोलिसांकडून मात्र एखाद्याच वेळी कारवाईचा फार्स केला जातो. महामार्गावरून वाहनाला ताडपत्री बांधून गोवंशीय जातीच्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे दिसते. मात्र पोलिसांकडून एखाद्याच गाडीवर कारवाई केली जाते. धाराशिव, भूम आणि परंडा या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची आणि गोमांसाची वाहतूक केली जाते. मात्र, आठवड्यातून एखादीच कारवाई केली जाते.