आरंभ मराठी / धाराशिव
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर आज सायंकाळी पाच वाजल्यापासून युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून भारताने काही अटींसह युद्धविराम करण्याचा निर्णय जाहीर केला.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले होते. त्यातच मागील चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते.
दोन्ही देशांच्या सीमा भागात यामुळे शांतता भंग पावली होती. आज दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन) यांनी फोन करून भारताला युद्धविराम करण्याची विनंती केली होती. भारताने दहशतवादाशी कुठलीही तडजोड न करता काही अटींसह युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला.
भारताने मिसाइल आणि ड्रोन ने हल्ले केल्यामुळे पाकिस्तानची पुरती गोची झाली होती. त्यातच जगभरातून पाकिस्तानला कुठल्याच देशाचे समर्थन मिळत नसल्यामुळे पाकिस्तान संकटात सापडला होता. भारतीय सैनिकांनी चार दिवसात अतुलनीय शौर्य करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.
दोन्ही देशातील संबंध दिवसेंदिवस अजूनच तणावाचे बनत असल्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांना युद्धविराम करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पाकिस्तानने भारतासमोर युद्धविराम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला भारताने काही अटींसह मान्यता दिली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर युद्धविराम जाहीर झाल्यामुळे भारताच्या तिन्ही दलांनी आता सीमेवरील लष्करी कारवाई थांबवली आहे.
युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानने कुरापत काढल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. सध्या सीमेवरील परिस्थिती शांत झाली असून दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. दिनांक 12 मे रोजी पुन्हा एकदा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार असून युद्धबंदीचा अंतिम निर्णय घेऊ शकतात.
युद्धबंदीच्या निर्णयाचे दोन्ही देशातील नागरिक स्वागत करत आहेत. भारतीय लष्कराने मागील चार दिवसात केलेल्या अतुलनीय शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असून, लष्कराच्या समर्थनार्थ संपूर्ण देशात देशभक्तीचे वारे संचारले होते.