आरंभ मराठी / धाराशिव
शेतजमिनीच्या मोजणीनंतर शेतात हद्दीच्या खुणा करण्यासाठी शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी राजू गंगाराम काळे (वय-५४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.९) उशिरा रंगेहाथ पकडले.
काळे यांनी शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील तीन हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना कळंब येथील शिवाजी चौक परिसरात ही यशस्वी कारवाई करण्यात आली. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, कळंब येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतजमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
भूमी अभिलेख कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी राजू काळे यांनी दिनांक ८ मे रोजी मोजणी केली होती. शेतात हद्दीच्या कायमस्वरूपी खुणा करण्यासाठी काळे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली होती. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यावरून ही कारवाई करण्यात आली. काळे यांना पंचासमक्ष तीन हजार रुपये स्वीकारताना पकडले. यावेळी आरोपीकडून लाच रक्कमेसह एकूण 7 हजार 620 रुपये रोख रक्कम, अंगठी, शेतमोजणीची कागदपत्रं, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक धाराशिव सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांच्या पथकाने केली. शासकीय काम करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधाव असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.