आरंभ मराठी / धाराशिव
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता ८ तारखेला महिला दिनी मिळाल्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट बघत आहेत.
या महिलांसाठी दिलासादायक बातमी असून महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी दिनांक ३० एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या योजनेत लाभार्थी महिलांना नऊ महिन्यांचे दरमहा दीड हजार रुपयांप्रमाणे १३ हजार ५०० रुपये मिळाले आहेत.
सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. मार्च महिन्यापर्यंत या योजनेचा हप्ता महिलांना सहजपणे मिळाला. आता लाभार्थ्यांच्या अपात्रतेच्या निकषांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
त्यात चारचाकी वाहने असलेल्यांचे नाव वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्याच्या हप्त्याला विलंब होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे.
त्यामुळे मार्च महिन्यात ज्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले होते त्याचप्रमाणे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा विचार होऊ शकतो असे बोलले जात आहे.
निम्मा एप्रिल महिना संपत आला तरी योजनेच्या दहाव्या हप्त्याबद्दल अजूनही निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने महिलांना हा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९२ हजार महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
घरी कार आहे का, याची तपासणी सुरू –
लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे अशा अपात्र महिलांना यंदा दीड हजार रुपये मिळणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी कार आहे का नाही याची तपासणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे, तर कार असलेल्या लाभार्थीनी स्वयं प्रेरणेने लाभ सोडावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
३५ महिलांनी लाभ नाकारला –
लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील ३५ महिलांनी स्वतः होऊन नाकारला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे, नोकरी लागल्यामुळे तसेच योजनेचा लाभ नको असल्याचे कारण देत आतापर्यंत ३५ महिलांनी या योजनेचा लाभ नाकारला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यात लाभ नाकारणाऱ्या महिलांची संख्या अतिशय कमी आहे.