वाघाचा ठावठिकाणा नसल्यामुळे पुण्याची रेस्क्यू टीम माघारी परतली
वाघाला पकडण्याची मोहीम थंडावली
आरंभ मराठी / धाराशिव
येडशी रामलिंग अभयारण्यात चार महिन्यापूर्वी दाखल झालेला टिपेश्वर येथील वाघ मागील एक महिन्यापासून बेपत्ता असून, वाघाचा नेमका ठावठिकाणा कुठे आहे याची माहिती वनविभागाकडेही नसल्याचे समोर आले आहे.
वाघाला पकडण्यासाठी आलेली पुण्याची रेस्क्यू टीमदेखील आता पुण्याला परतली असून, वाघाला पकडण्यासाठी सध्या कुठलेच प्रयत्न सुरू नाहीत. तीन आठवड्यापासून या वाघाने एकाही पाळीव जनावराची शिकार केली नसल्यामुळे वाघ नेमका गेला कुठे? हा प्रश्न सामान्य नागरिकांसह वनविभागाला देखील पडला आहे. वाघाला पकडण्याची मोहीम सुरू करून आज तीन महिने झाले तरी वनविभागाला त्यात यश आले नाही.
मागील चार महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला वाघ सध्या गायब झाला आहे. पुण्याची रेस्क्यू टीम मागील अडीच महिन्यांपासून वाघाचा शोध घेत आहे. मात्र वाघ सतत चकवा देऊन पसार होत आहे. त्यातच हा वाघ मागील एक महिन्यापासून गायब झाला आहे. येडशीच्या रामलिंग अभयारण्यात या वाघाचा मागील तीन महिन्यांपासून मुक्काम होता.
परंतु, मागील तीन आठवड्यात या वाघाने एकदाही दर्शन न दिल्यामुळे वाघ नेमका कुठे गेला हे कोणालाच सांगता येत नाही. या वाघाने आतापर्यंत धाराशिव, वाशी, भूम, परंडा आणि बार्शी या भागातील साठ पेक्षा अधिक जनावरांची शिकार केली आहे. शिकार केल्यानंतर हा वाघ जागा बदलत असल्यामुळे रेस्क्यू टीम तिथे पोहोचेपर्यंत वाघाने दूर पळ काढलेला असतो. त्यामुळे मोहीम यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत.
वाघाला जेरबंद करण्यासाठी डार्ट गनचा तीनवेळा केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रेस्क्यू टीमकडून नवीन योजना आखून वाघ पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी काही डॉक्टर आणि शूटर यांची संख्या टीममध्ये वाढवण्यात आली होती. परंतु, वाघाचा पत्ताच नसल्यामुळे रेस्क्यू टीमला हातावर हात मारून बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता.
रेस्क्यू टीम पुण्याला परतली –
या वाघाला पकडण्यासाठी दिनांक १३ जानेवारी पासून चंद्रपूर येथील डॉ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीम दाखल झाली होती. या टीमने आठ दिवस वाघाचा शोध घेतल्यानंतर ही टीम आल्या पावली रिकाम्या हाताने परतली. त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीमला वाघाला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली. या टीमने दिनांक २२ जानेवारी पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. मागील अडीच महिन्यात या टीमने वाघाला पकडण्याचे पुरेपूर प्रयत्न केले परंतु, वाघ हाती लागलाच नाही.
तीन वेळा डार्ट गनचा केला वापर –
वाघाला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमने एकूण तीन वेळा डार्ट गनचा वापर केला. परंतु, तीनही वेळा रेस्क्यू टीमच्या पदरी निराशा आली. रेस्क्यू टीमने पहिल्यांदा ९ फेब्रुवारी रोजी डार्ट गनचा वापर केला होता. परंतु, नेम हुकल्यामुळे वाघ पसार झाला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा डार्ट गनचा वापर करण्यात आला. यावेळी नेम बरोबर लागला. परंतु, वाघाने स्वतःच मारलेले इंजेक्शन उपसून काढले आणि धूम ठोकली. तिसऱ्यांदा २६ फेब्रुवारी रोजी डार्ट गनचा वापर करण्यात आला होता. परंतु, तिसऱ्या वेळीही नेम हुकल्यामुळे वाघ निसटला. त्यानंतर संपूर्ण मार्च महिन्यात वाघाने रेस्क्यू टीमला एकदाही पकडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे रेस्क्यू टीमला हातावर हात मारून बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.
१६ मार्चला वाघाचे शेवटचे दर्शन –
रेस्क्यू टीमला वाघाचे शेवटचे दर्शन एक महिन्यापूर्वी दिनांक १६ मार्च रोजी झाले होते. १६ मार्च रोजी अभयारण्य परिसरातील गुरुकुल येथे वाघाने एका गाईची शिकार केली होती. त्यावेळी अभयारण्यात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे शेवटचे दर्शन झाले होते. त्यानंतर हा वाघ नेमका कुठे गायब झाला हे कोणालाच माहिती नाही.
दुसरी रेस्क्यू टीमही रिकाम्या हाती परतली –
ताडोबा येथील रेस्क्यू टीम रिकाम्या हाती परतल्यानंतर पुण्याच्या रेस्क्यू टीमकडे वाघ पकडण्याची जबाबदारी दिली होती. मार्च महिन्यात वाघाने फक्त एकदाच ट्रॅप कॅमेऱ्यात दर्शन दिले होते. त्यानंतर वाघ गायब झाला आहे. या काळात वाघाने एकाही पाळीव पशुवर हल्ला केल्याची घटना घडली नाही. त्यामुळे रेस्क्यू टीमला हातावर हात देऊन बसण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वनविभागाने रेस्क्यू टीमला परत पाठवले. त्यामुळे दुसरी रेस्क्यू टीमदेखील आल्या पावली रिकाम्या हाताने परतली. वाघ पकडण्याची मोहीम सुरू करून आज तीन महिने झाले. या काळात लाखो रुपये खर्च झाले पण वाघ हाती लागला नाही.
वाघाला पकडण्याची मोहीम थांबवली का?
वाघाला पकडण्याची मोहीम वनविभागाने थांबवली का अशी विचारणा केली असता, ही मोहीम सुरूच असल्याचे सांगितले. वाघाचा ठावठिकाणा माहीत नसल्यामुळे रेस्क्यू टीमला परत पाठवले असून, वाघाचे नेमके लोकेशन माहिती झाल्यास पुन्हा एकदा रेस्क्यू टीमला बोलवण्यात येणार आहे. यावेळी परत गेलेली पुण्याची रेस्क्यू टीम बोलवायची की, दुसरी याचा निर्णय मुंबई येथून वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याची माहिती मिळाली.