2 महिन्यापूर्वी चौकी मंजूर,पण प्रशासनाला पडला विसर
आरंभ मराठी / धाराशिव
टवाळखोरीसह गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून मंजूर झालेल्या जिजाऊ चौकातील पोलिस चौकीचा पोलिस प्रशासनाला विसर पडला आहे.
आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने ११ ऑक्टोबर रोजी पोलिस महासंचालकांनी पोलिस चौकी मंजूर केली होती. मात्र, दोन महिन्यांत चौकीसाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.
धाराशिव शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
विशेषत: शहरातील वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून,त्यामुळे जिजाऊ चौक परिसरात शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस असल्याने टवाळखोरी रोखण्यासाठी, वाहतूकीला शिस्त लागण्यासाठी पोलिस चौकीची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीची दखल घेऊन आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात गृह विभागाकडे पाठपुरावा केला.
त्यानंतर जिजाऊ चौकासाठी पोलिस चौकी मंजूर झाली असून, दोन महिने उलटले तरी या चौकीचे काम सुरू झालेले नाही. या चौकात पोलिसांची चोवीस तास गरज असताना केवळ वाहतूक पोलिसांची ड्युटी लावलेली असते.
टवाळखोरांच्या गटामध्ये वादाच्या घटना घडल्यानंतर नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी लागते. मात्र पोलिसांना पोहोचण्यासाठी विलंब लागतो. तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाते.त्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या पोलिस चौकीचे काम तत्काळ सुरू व्हावे, अशी मागणी केला जात आहे.
लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना अपेक्षा
धाराशिव जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्या, लूटमार रोखण्यासाठी पोलिस विभागाला लोकप्रतिनिधींनी सूचना देण्याची गरज आहे. मात्र इतक्या घटना घडत असताना कुणीही विचारत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.या गंभीर विषयावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पोलिस विभागाची बैठक घेण्याची गरज आहे.