आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर पालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) तीन महिने उलटले तरी तपास सुरू न केल्याने ही समिती म्हणजे फार्स ठरणार का,असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीमुळे हा तपास मागे राहिला होता, असे पोलिस अधिकारी सांगत आहेत. मात्र आता निवडणुका होऊन जवळपास 15 दिवस उलटले आहेत. पथकाने आतातरी तपासाला गती द्यावी,अशी मागणी होत आहे.आमदार सुरेश धस यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याच्या गृह विभागामार्फत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश काढण्यात आले होते.त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी समिती नेमली होती.
धाराशिव नगरपालिकेत कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहाराबाबत माजी राज्यमंत्री,आमदार सुरेश धस यांच्या तक्रारी आहेत. या गैरव्यवहाराबाबत पोलीस महासंचालकांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना विशेष तपास पथकामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, एसआयटीकडून तपास संथगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.
या एसआयटी समितीचे अध्यक्ष म्हणून अपर पोलीस अधीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचा या समितीमध्ये समावेश आहे. दरम्यान अपर पोलीस अधीक्षकांनी सण आणि निवडणुकांचे कारण देत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
धाराशिव नगरपालिकेत वेगवेगळ्या प्रकरणात कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याच्या तक्रारी असून,यापैकी काही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची (विशेष तपास पथक) नेमणूक केली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक हसन गौहर, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचा समावेश आहे. एसआयटीने दर महिन्याला पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करावा, असे सूचित केले होते.
दरम्यान, या तपास पथकाकडून पालिकेतील कोणकोणती प्रकरणे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धाराशिव नगर पालिकेत अनेक प्रक्रारचे आर्थिक गैरव्यवहार झाले असून, या भ्रष्टाचाराची एसआयटीकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री,आमदार सुरेश धस यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
चौकशीचा फेरा कायम
तीन वर्षांपासून धाराशिवची नगर पालिका चौकशीच्या फेर्यात आहे.
धाराशिव नगर पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांची प्रशासकपदी नेमणूक झाल्यापासून पालिकेला ग्रहण लागले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून, विकासाची कामे ठप्प झाली आहेत. नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दुसरीकडे भ्रष्टाचारामागून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने पालिका तीन वर्षांपासून चौकशीच्या फेर्यात आहे. आता एसआयटीच्या चौकशीमध्ये आणखी प्रकरणांचा गुंता वाढत जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सखोल चौकशी आवश्यक
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या मागणीची दखल घेत पोलिस महासंचालकांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षकांना एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी एसआयटीची नेमणूक केली आहे. पालिकेत दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा सखोल तपास करावा, असे या विशेष पथकाला सूचित करण्यात आले आहे. तपासासंदर्भात आजवर केवळ दोन बैठका झाल्या. नंतर सण-उत्सव आणि निवडणूकांमुळे तपासात प्रगती झाली नाही. आता लवकरच या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी सांगितले.