आरंभ मराठी / धाराशिव
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार सध्या जोरात सुरू आहे. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होईल असे बोलले जात आहे.
एक महिन्यांपूर्वी सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यातच नवीन नोंदणी केलेल्या आणि काही तांत्रिक अडचणीमुळे अगोदर नोंदणी केलेल्या काही महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नव्हता. आता सरकारने या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याची तयारी सुरू केली आहे.
सरकारकडून या योजनेची जोरदार प्रसिध्दी केली जात आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 29 तारखेला 1500 रुपये मिळणार आहेत. दिनांक 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे महायुती सरकार एक मोठा कार्यक्रम घेणार आहे.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या मुहूर्तावर राज्य सरकार तिसरा हप्ता देऊन नारीशक्तीचा सन्मान करणार आहे.