आरंभ मराठीने उचलला होता मुद्दा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पालिकेने काढले टेंडर, पुढच्या आठवड्यापासून अंमलबजावणी
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरासह तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात सर्वत्र मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येक चौकात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडलेला असतो. या जनावरांमुळे अपघात देखील होत आहेत. ‘आरंभ मराठी’ने वर्तमानपत्रातून आणि यूट्यूब चॅनेलवरून धाराशिव तसेच तुळजापूर, उमरगा, कळंब येथील मोकाट जनावरांचा विषय लावून धरला होता. यावरून पालिकेच्या अकार्यक्षमतेवर देखील बोट ठेवले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकेला मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धाराशिव तसेच तुळजापूर पालिकेने यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढच्या आठवड्यापासून मोकाट जनावरे उचलून गो शाळेत पाठवली जाणार आहेत. तसेच अशा जनावरांना आणण्यासाठी गेल्यानंतर दंड भरावा लागणार आहे. सात दिवसानंतर ही जनावरे मालकांना परत दिली जाणार नाहीत.
रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ‘आरंभ मराठी’ने धाराशिव, कळंब,तुळजापूर आणि उमरगा या शहरातील मोकाट जनावरांच्या बातम्या ‘आरंभ मराठी’ने सचित्र प्रसिद्ध केल्या होत्या. याच बातमीचा परिणाम म्हणून धाराशिव नगरपालिकेने आता शहरातील मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून टेंडर काढले असून खाजगी कंपनीलाच हे काम देण्यात येणार असल्याचे समजते.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण, चार संस्थानी भरले टेंडर
यामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजिकरण करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत चार खाजगी कंपन्यांनी हे टेंडर भरले असून पालिकेकडून त्याची छाननी सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात चारमधून एका कंपनीची निवड पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी सध्या ऑनलाइन टेंडर भरण्यास सुरुवात झालेली आहे. मंगळवारपर्यंत हे टेंडर भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याची छाननी होणार आहे. यातील एका कंपनीची निवड केली जाणार आहे. मोकाट जनावरांच्या बाबतीत पालिकेकडून आता कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. पालिकेकडून टेंडर घेतलेल्या कंपनीला कोंडवाड्यासाठी शहरात जागा देण्यात येणार आहे. शहरातील सर्व मोकाट जनावरे पकडल्यानंतर सुरुवातीला पहिले सात दिवस शहरातच त्या जनावरांना ठेवण्यात येईल. सात दिवसात जर जनावराचे मालक जनावर घेऊन जाण्यासाठी आले तर मालकाला पाचशे ते हजार रुपयांपर्यंत रोख दंड आणि जनावरे संभाळण्यासाठी आलेला खर्च त्या मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. सात दिवसानंतर ही जनावरे सोलापूर येथील गोशाळेत नेण्यात येतील.
पालिका ॲक्शन मोडवर
मोकाट कुत्री, जनावरे, डुक्कर यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका आता ऍक्शन मोडवर येऊन काम करणार आहे. पुढील पंधरा दिवसात कंपन्यांची निवड करून ऑक्टोबर पासून कंपनी मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचे काम करेल अशी अपेक्षा आहे. तुळजापूर शहरातील पालिकेने मोकाट जनावरे व मोकाट कुत्री यांचा बंदोबस्त करण्याचे काम एकाच कंपनीला दिल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिवमध्ये मात्र यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. आरंभ मराठीने सतत पाठपुरावा केलेल्या विषयाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. येणाऱ्या काही दिवसात धाराशिव शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.