आरंभ मराठी / धाराशिव
मराठवाड्याच्या मातीतल्या माणसांचा निजाम आणि रझाकाराविरुद्धचा रक्तरंजित संघर्ष आणि या मातीतल्या माणसाचं बलिदान विस्मरणात जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच आता केंद्र सरकारने हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून, या लढ्याच्या पराक्रमाची गाथा आता देश पातळीवर ऐकवली जाणार आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारने 12 मार्च रोजी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे यापुढे दर १७ सप्टेंबर रोजी केंद्रीय स्तरावर हैदराबाद मुक्तीसंग्राम साजरा होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हैदराबाद संस्थानात निजामशाही चालू होती. त्याविरोधात मराठवाड्यातील व एकूणच हैदराबाद संस्थानातील क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढा चालवला. यात कित्येकांना प्राणाला मुकावे लागले, कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. गावंच्या गावं जळून बेचिराख झाली. या लढ्याला पुर्ण विराम दिला तो भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी. पोलीस ॲक्शनच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका घेत निजामशाही उलथून टाकून हैदराबाद संस्थान मुक्त केले. नुकताच त्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. या सर्व लढ्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा करावा अशी स्वातंत्र्यसैनिकांसह जनतेची ही मागणी होती. याचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे व तशी अधिसूचना देखील १२ मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह सर्व शासन-प्रशासन यंत्रणेचे आभार मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे व इतर पदाधिकारी यांनी मानले आहेत.