प्रतिनिधी / वाशी
तालुक्यातील मांडवा येथील सरपंच डॉ. योगिनी देशमुख यांच्यावर सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव आठ विरूध्द एक अशा मताने मंजूर करण्यात आला.त्यानंतर सदस्यांनी तसेच सर्व विरोधकांनी गावात जल्लोष केला. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करत असल्याचा सरपंचावर आरोप होता.
मांडवा येथील ग्रामपंचायतसाठी 9 सदस्य असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदावर 3 वर्षापूर्वी डॉ. योगिनी देशमुख यांची निवड झाली होती. दरम्यानच्या काळात गावातील कामकाजात सदस्यांना सहभागी करुन घेतले जात नसल्याची तक्रार वारंवार केली जात होती.
3 जानेवारी रोजी अन्य सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव आणला. त्यानुसार तहसीलदार नरसिंग जाधव यांनी मंगळवारी सदस्यांची विशेष सभा बोलावली.यावेळी मतदान घेण्यात आले. त्यात सरपंच डॉ. योगिनी देशमुख यांच्या बाजूने त्यांचे स्वतःचे एकच मत पडले. तर उमेश देशमुख, नितीन रणदिवे, भगतसिंह गहेरवार, अरुण शिंदे, आरेफा पठाण, सुनील पाटील, शोभा मगनसिंह चौहान,आशा तानाजी माळी या आठ सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे डॉ. योगिनी देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.त्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.त्यानंतर सदस्यांनी तसेच विरोधकांनी गावात जल्लोष साजरा केला. सरपंचाकडून कामकाजात सहभागी करुन घेतले जात नसणे, ग्रामपंचायत रेकॉर्ड न दाखवणे, मनमानी कारभार करणे, अरेरावी करणे,असे अनेक आरोप सरपंचावर करण्यात येत होते. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असे, सदस्यांनी सांगितले.