प्रतिनिधी/ धाराशिव
जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात तब्बल ९० बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यापैकी ४२ वैद्यकीय व्यवसायिकांचे व्यवसाय कायमसवरूपी बंद करण्यात आले असून, त्यांच्यावर कठोर कारवाया करण्यात आल्या आहेत.दरम्यान, आरोग्य विभागांतर्गत बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, समितीने बोगस डॉक्टर आढळून आल्यास कारवाया सुरू कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांचा तालुकानिहाय गोषवारा सादर करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये 90 व्यवसायीकांची नोंद झाली आहे. त्यापैकी तालुकाअंतर्गत विविध पोलिस स्टेशनमध्ये 26 व्यवसायीकांवर अनाधिकृत वैद्यकीय पोलिस तपास सुरु आहे.15 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.तसेच 42 व्यावसायिकांना यादीतून काढून टाकण्यात आले.यामध्ये व्यवसाय बंद केलेले, फरार, मयत आदींचा समावेश आहे.
तालुकास्तरीय ग्रामीण व शहरी पथकांनी प्राप्त तक्रारी व माहितीनुसार गुन्हे दाखल न झालेल्या उर्वरित सर्व व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करावेत व व्यवसाय बंद केलेले व्यवसायीकांनी पुन्हा व्यवसाय चालू केले किंवा नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.जर त्यांनी नंतर व्यवसाय चालू केला असेल तर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात यावी.असे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक बोगस वैद्यकीय व्यवसायिक व्यवसाय करीत आहे,अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अशा अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांवर प्रतिबंधात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकास्तरीय पथके गठित करण्यात आले आहे.ग्रामीण स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी ( संबंधित तालुका ), गटविकास अधिकारी प्रतिनीधी (संबंधित तालुका), सहाय्यक पोलिस निरिक्षक/पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र).
शहरी भागात अतिरिक्त शल्यचिकित्सक हे धाराशिव शहराकरीता इतर सर्व तालुक्यासाठी वैद्यकीय अधीक्षक (संबंधित तालुका), मुख्याधिकारी नगर परिषद ( संबंधित तालुका),सहाय्यक पोलिस निरिक्षक / पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र).तालुका स्तरीय गठीत पथकास सन 2022-23 या वर्षात अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांवर कारवाईसाठी मान्यता देण्यात आली. तालुकास्तरावर पथकाने कार्यवाही करताना संबंधित व्यवसायीकाची माहिती घेण्यात यावी.
बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सह संचालक कुष्ठरोग डॉ.मारुती कोरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड आणि सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तालुका सर्व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.