अमोलसिंह चंदेल / धाराशिव
पावसाने ओढ दिल्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळी छाया गडद होताना दिसत आहे. पावसाळा केवळ एक महिना उरला असून, तीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठ विशेषतःशेतीवर अवलंबून आहे. यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आल्याने बाजारपेठेत नैराश्याचे मळभ दाटून आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत त्यामुळे शुकशुकाट जाणवत आहे.दरम्यान, परिस्थिती अशीच राहिल्यास यावर्षीच्या बैल पोळ्यावरही सावट दिसून येण्याची शक्यता आहे.
पावसाला उशिरा सुरुवात झाली तरी मोठ्या आशेने शेतक-यांनी खरीप पेरणी उरकली होती.त्यानंतर मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे. तर शेतकरी डोळयात प्राण आणून पावसाची प्रतिक्षा करत आहेत. परंतू पावसाअभावी हे पीक करपून गेले व पुन्हा दुष्काळी दुष्टचक्र निर्माण होत आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा बाजारपेठेवर परिणाम होवून कृषीविषयक तसेच इतर दैनंदिन साहित्याची बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही मंदावली आहे.काही दिवसात पाऊस न झाल्यास बळीराजाचा महत्वाचा सण बैलपोळा देखील संकटाच्या सावटात सापडेल, अशी परिस्थिती आहे.
..तर गंभीर परिस्थितीचा सामना
पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास येणा-या काळात अत्यंत गंभीर स्वरुपाचा संकटाचा सामना करावा लागणार आहे, अशी स्थिती आहे.पावसाच्या दडीमुळे शेतीसाठी लागणारा साहित्याचा पुरवठा करणा-या तसेच इतर म्हणजेच कपडा, किराणा आदी बाजारपेठेवरही विपरित परिणाम झाला असून याव्दारे होणारी उलाढाल प्रचंड मंदावली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे फवारणी, खत या साहित्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यास शेतकरी धजावेनासा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी केंदावरील शेतक-यांकडून खरेदी विक्री मंदावली असून एकूणच त्याची झळ कृषी सेवा केंद्र तसेच इतर व्यवसायिकांना बसत आहे. निसर्गाचा फटका बसल्याने संभाव्य संकटाने बळीराजाची झोप उडाली आहे. सध्या शेतकऱ्यांना पावसाचा तर व्यापा-यांना ग्राहकांचा आधार मिळणे आवश्यक आहे. ग्राहकांचा ओघ कमी असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
एकरी 15 हजार रुपयांचा जुगार
समाधानकारक पाऊस नसतानाही शेतक-यांनी निसर्गाच्या भरवशावर खरीप पेरणी केली. वास्तविक पाहता सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान 15 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च यावर्षी जुगार ठरला आहे. त्यात शेतकरी हरला असून,हा खर्चही पदरात पडण्याची शक्यता दिसत नाही. नांगरणी 2 हजार 500, पाळी 1000 रुपये, पेरणी 900 रुपये, खत 1 हजार 300 रुपये, बियाणे 3 हजार रुपये, खुरापणी 5 हजार, फवारणी 2 हजार रुपये असा एकूण खर्च येतो.
उलाढाल ठप्प,रब्बीही संकटात
जवळपास दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी कोणत्याही शेतीपुरक साहित्य खरेदीसाठी धजावत नाहीत. त्यामुळे यावर्षी खरीपाची विदारक परिस्थिती झाली असून येणा-या काळातही परिस्थिती भीषण होईल अशी चिन्हे आहेत. सध्या दुकानात एकही शेतकरी साहित्य खरेदीसाठी येत नाही तसेच रब्बी हंगामातही पेरणी होईल अशी आशा वाटत नाही.
प्रसन्न कस्तुरकर , कृषी सेवा केंद्र चालक, शिराढोण
कपड्यांना मागणी नाही
बाजारपेठेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा साहजिकच कपड्याच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. कपडे खरेदी ही ग्राहकांसाठी निकडीची बाब नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कपड्याची खरेदी तर मागे पडली आहे.
– रामेश्वर मुंदडा, कापड व्यापारी, शिराढोण.