प्रतिनिधी / धाराशिव
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲड.मिलींदजी पाटील यांची Project & Development India Limited (PDIL) च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री सिध्दीविनायक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकामध्ये श्री सिध्दीविनायक परिवारातील पहिली पतसंस्था जनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन २२ ऑगस्ट २००२ मध्ये मिलिंद पाटील यांच्याच हस्ते केल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी जनसमृद्धी पतसंस्थेला पहिली ठेव पण मिलिंद पाटील यांनी दिली या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी ऍड. मिलिंद पाटील यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या वाढत्या आलेखाबद्दल संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या. आजपर्यंत झालेल्या सत्कारांपैकी हा सर्वात मनाला भावणारा सत्कार असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी बालाजी कोरे, ॲड.प्रतिक देवळे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, रामचंद्र सारडे व श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.