4 वर्षांपासून 75 वर्षाच्या महिलेवर अत्याचार, अल्पवयीन 3 मुली ठरल्या शिकार
आरंभ मराठी Exclusive
सज्जन यादव / आरंभ मराठी
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच आई तुळजाभवानीचा म्हणजे नारीशक्तीचा, पुरोगामी विचारांचा धाराशिव जिल्हा देखील महिला सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात 20 जुलै ते 25 ऑगस्ट या 35 दिवसांत धाराशिव जिल्ह्यात बलात्काराचे तब्बल 9 गुन्हे दाखल झाले असून, म्हणजेच जिल्ह्यात दर चार दिवसाला एक बलात्काराची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी भूम येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेनंतर जिल्हा महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न पडला आहे.
–
बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याविरोधात निषेध मोर्चे काढले. धाराशिव जिल्ह्यात देखील त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला गेला. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्हा हादरला. बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवत असतानाच आपल्याच जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गेल्या 35 दिवसात बलात्काराचे 9 गुन्हे नोंद झालेले आहेत. चार वर्षांच्या लहान बालिकेपासून ते 75 वर्षांच्या वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यामुळे जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या घटनेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दाखल झालेल्या एकूण नऊ गुन्ह्यांपैकी तीन बलात्काराच्या घटना अल्पवयीन मुलीवर झाल्या असल्यामुळे जिल्ह्यात हा काळजीचा विषय झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकीकडे चोरी, घरफोडी, दरोडे यासारखे गुन्हे वाढलेले आहेत तर दुसरीकडे लैंगिक अत्याचाराचे देखील गुन्हे वाढलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एरव्ही धाराशिव सारख्या जिल्ह्यात बलात्कारासारखे गंभीर गुन्हे नियंत्रणात असतात. परंतु गेल्या काही दिवसापासून गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला की काय अशी शंका येत आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर, शेतात गेलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसात उघडकीस आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बदलापूर, लातूर, कोल्हापूर येथील घटना उघडकीस आल्या. राजकीय पक्षांकडून देखील राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवले जात आहे.
आठही तालुक्यात बलात्काराचे गुन्हे
धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यात बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. उमरगा शहरात एका चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील परप्रांतीय आरोपीला तात्काळ पकडण्यात आले होते. दुसरीकडे परंडा तालुक्यात पंचाहत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. नुकतीच भूम येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे.
तुळजापूरमध्ये सर्वाधिक घटना
जिथे नारीशक्तीचा सन्मान केला जातो अशा आई तुळजाभवानीच्या तुळजापूर तालुक्यात बलात्काराच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 35 दिवसात तुळजापूर तालुक्यात तीन बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत. यातील एका घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आई तुळजाभवानीच्या नगरीतच महिलांवरील अत्याचार वाढल्याने जिल्ह्यासाठी ही संतापजनक बाब आहे.
नूतन पोलीस अधीक्षकांसमोर आव्हान
धाराशिव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून संजय जाधव यांनी नुकताच पदभार घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटना, घरफोड्या, दुचाकी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना आता महिला अत्याचारासारख्या गंभीर घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान आहे. नूतन अधीक्षक यांना पोलीस सेवेचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत.
–
35 दिवसातील महिला अत्याचाराच्या घटना
1) 20 जुलै – उमरगा पोलीस स्टेशन – 28 वर्षीय महिलेवर अत्याचार
2) 28 जुलै – धाराशिव पोलीस स्टेशन – 25 वर्षीय महिलेवर अत्याचार
3) 29 जुलै – तुळजापूर पोलीस स्टेशन – 26 वर्षीय महिलेवर अत्याचार
4) 31 जुलै – तुळजापूर पोलीस स्टेशन – 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
5) 2 ऑगस्ट – लोहारा पोलीस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर अत्याचार
6) 7 ऑगस्ट – तुळजापूर पोलीस स्टेशन – 31 वर्षीय महिलेवर अत्याचार
7) 8 ऑगस्ट – परंडा पोलीस स्टेशन – 75 वर्षीय महिलेवर अत्याचार
8) 16 ऑगस्ट – शिराढोण पोलीस स्टेशन – 34 वर्षीय महिलेवर अत्याचार
9)25 ऑगस्ट – भूम पोलीस स्टेशन – 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार