राजवर्धन भुसारे |ढोकी
धाराशिव जिल्ह्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर नेहमीप्रमाणे व्यायाम करून घरी परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चालकाने जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गाडी चालवली. चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे नियंत्रण ढळले, परिणामी टिप्पर खा. राजेनिंबाळकर यांच्या अंगावर जात असतानाच खासदार ओमराजे यांनी स्वतः बाजूला होत स्वतःचा बचाव केला.दरम्यान खासदार ओमराजेंच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास ताब्यात घेऊन चौकशी करून नोटी देऊन सोडून देण्यात आले.मोबाईलवर बोलण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चालकाने कबुली दिली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर दररोज ढोकी ते तेर या रस्त्यावर पहाटे व्यायामास जात असतात. गुरुवारी( दि.८) नेहमीप्रमाणे खा. निंबाळकर व्यायाम करून आपल्या निवासस्थानाकडे सकाळी ०८.३२ च्या सुमारास परतत असताना समोरून येणारा टिप्पर क्र.एम.एच.४४-के-८८४४ चा रामेश्वर बंडू कांबळे याने जीवितास धोका निर्माण होईल असे भरधाव वेगात बेदरकारपणे टिप्पर चालवले.गाडी आपल्याकडे येत असल्याचे दिसताच खा.राजेनिंबाळकर बाजूला सरकले व टिप्पर चालकाचा पाठलागही केला.या टिप्पर चालकाविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात खासदार राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक रामेश्वर कांबळे(रा.अंबेजोगाई) यास ताब्यात घेण्यात आले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार राजाभाऊ सातपुते करत आहेत.
गाडी चालवत मोबाईल वापरणे आले अंगलट!
सदर चालक धाराशिव येथून विटा खाली करुन येत असताना चालकास आलेला मोबाईल घेत असताना गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला गेल्याचा कबुली जवाब ढोकी पोलीस ठाण्यात चालक कांबळे याने दिला असून पोलिसांनी कांबळे यास नोटीस देऊन गुरुवार दिं.८ रोजी रात्री उशिरा सोडले.
ढोकी-तेर रस्त्यावर बेदरकार वाहने चालवण्याची संख्या वाढली
दिंडी मार्गात कळंब ते धाराशिव रस्त्याचे काम झाल्याने रस्ता सुसाट झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिवला जाण्यासाठी अनेक जण हा मार्ग निवडू लागले आहेत. या मार्गावरून धावणारे टिप्पर भरधाव वेगात असतात. त्यांच्या वेगामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून अशा चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.