डॉक्टर कन्या व गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव
आरंभ मराठी / तामलवाडी
भारतीय सैन्य दलात तब्बल २८ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सुभेदार श्री. शाम रघुनाथ डोंगरे यांचा तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावकऱ्यांच्या वतीने बैलगाडीतून टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून उत्साहात नागरी सत्कार करण्यात आला. देशसेवेत मोलाची कामगिरी बजावून गावात परतलेल्या या वीर सैनिकाच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पारंपरिक टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने गावात अक्षरशः उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुभेदार डोंगरे यांच्या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना दाटून आली होती.
याचवेळी गावातील कु. समृद्धी बालाजी डोंगरे हिने वैद्यकीय क्षेत्रातील BHMS पदवी संपादन करून ‘डॉक्टर’ होण्याचा मान मिळविल्याबद्दल तिचाही विशेष सत्कार करण्यात आला. एकाच कुटुंबातील सैनिक आणि डॉक्टर अशा दुहेरी यशाचा गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.
तसेच पांगरदरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैधवी महादेव गायकवाड, प्राणिती राम मते, संचिता सचिन मते, सरस्वती दादाराव साळुंके, वैभवी सतीश कदम, राजनंदिनी दादाराव मोरे, कल्याणी मल्हारी क्षीरसागर व सोहम सहदेव कदम या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
गावातील वार्षिक दिंडी यात्रेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कान्होबा महाराज देहूकर यांच्या कीर्तन सेवेनंतर सांगता करण्यात आली. सैनिक, डॉक्टर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा एकत्रित गौरव झाल्याने पांगरदरवाडी गावात अभिमानासोबतच प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.








