आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी धाराशिव तालुक्यातील एकूण १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या २४ गणांसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रिंगण चांगलेच गजबजले आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी सांजा गटातून कल्याण गोविंद देढे आणि यशवंत मारुती पेठे यांनी आपले अर्ज मागे घेतले. वडगाव सिद्धेश्वर गटातून मनीषा कल्याण देडे, तर बेंबळी गटातून जीवन रामभाऊ बर्डे यांनी माघार घेतली. उपळा (मा.) गटातून नेताजी वामनराव पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पळसप गटात पहिल्याच दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने विशेष चर्चा रंगली आहे. या गटातून बालाजी कल्याण धायगुडे, विजय भास्कर मुळे, विष्णू मुरलीधर एडके आणि संदीप ज्योतिराम एडके यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
पंचायत समितीच्या जागजी गणातून अमोल सुरेश शिंदे यांनी माघार घेतली असून, येडशी गणातून उमादेवी गोपाळराव सस्ते यांनीही पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच वाघोली पंचायत समिती गणातून सुलभा संजय खडके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारीपर्यंत असली तरी २५ व २६ जानेवारी हे सुट्टीचे दिवस असल्याने प्रत्यक्षात शनिवार २४ जानेवारी आणि मंगळवार २७ जानेवारी असे केवळ दोनच दिवस अर्ज माघारीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे या कालावधीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी राजी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोठी धावपळ सुरू होण्याची शक्यता आहे. आगामी दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार असून, अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.








