उमरगा तालुक्यातील दगड धानोरा येथे 19 एप्रिल रोजी महिलेवर झाला होता रानडुकरांचा हल्ला
लक्ष्मण पवार / आरंभ मराठी
उमरगा ; तालुक्यातील दगड धानोरा येथे रान डुक्करांनी हैदोस घातला असून, 19 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी शेतात काम करणाऱ्या 66 वर्षीय महिलेवर रान डूकराने प्राणघातक हल्ला केला होता. जागोजागी चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेवर उमरगा येथे उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला. रान डुकराने हल्ला केलेल्या गावातील आणखी एका गंभीर जखमी व्यक्तीवर पुण्यात उपचार सुरू आहेत.
दगड धानोरा येथील शेतकरी महीला श्रीमती गयाबाई गोपीनाथ जोगी ( वय 66 वर्षे), ही शेतामध्ये काम करत असताना तिच्यावर अचानक रान डूकरानी प्राणघातक हल्ला केला होता. यात हातावर, पायावर, गळ्यावर व सर्वांगावर चावा घेऊन सदर महिलेला रान डुक्कराने रक्तबंबाळ केले होते.
या महिलेला उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अधिक उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने परत उमरगा येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी या महिलेची प्राणज्योत मालवली. त्यामुळे दगड धानोरा गावात शोककळा पसरली आहे.
दीड महिन्यापूर्वी गावातील विठ्ठल माणिकराव जाधव (वय 43 वर्षे रा, दगड धानोरा) यांच्यावर रान डुक्कराने प्राणघातक हल्ला केला होता. ते सध्या पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
या भागात शेतकऱ्यांवर, गावकऱ्यांवर रानडुक्करांकडून वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून गावकऱ्यांचा बचाव करावा अशी मागणी होत आहे.