प्रतिनिधी / वाशी
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सुरू केलेल्या नाहीत. परिणामी शेतकरी अडचणीत असून,तत्काळ दुष्काळी उपाययोजना सुरू,कराव्यात या मागणीसाठी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जाणीव संघटनेच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात दुष्काळ घोषित होऊन दोन महिने लोटले तरी अद्याप शासनाच्या वतीने कुठल्याही दुष्काळी उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत. परिणामी ग्रामीण भागातून मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला तत्काळ काम द्यावे, जनावरांसाठी दावणीला चारा द्यावा, विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी मागण्याचे निवेदन तहसील कार्यालयाचे पेशकार जे.जे. तवले यांना यांना देण्यात आले. यावेळी जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे, मधुकर गायकवाड,जनक गायकवाड, किरण लगाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.