अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन;
प्रतिनिधि / वाशी :-
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथयात्रा काढण्यात आली आहे. या रथयात्रेचे शनिवारी (दि.२) दुपारी साडेबारा वाजता आगमन झाले. यावेळी शहरातील विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रथाचे स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश यांच्याकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृतज्ञता रथयात्रा काढण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामतील हुतात्मा स्मारक असलेली ठिकाणे, मुक्तिसंग्रामात अग्रेसर असलेली गावे येथून माती संकलन करत मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्मा व स्वातंत्र्य सैनिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही यात्रा छत्रपती संभाजी नगर येथे जाणार आहे.
अंबेजोगाई येथून सुरू झालेली ही यात्रा कळंब येथून पारा मार्गे शहरातील छत्रपती संभाजीराजे चौक येथे यात्रेचे आगमन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे व विश्वास कांबळे यांनी कृतज्ञता रथाचे पूजन करून स्वागत केले. तसेच शिवशक्ती चौक येथे शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते कृतज्ञता रथातील माती संकलन कलशाला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. शहरातील वर्तक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील रोड येथे ॲड. प्रदिप देशमुख यांनी शहरातील यात्रेचा समारोप केला व कृतज्ञता रथ भुमकडे मार्गस्थ झाला. यावेळी गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक राजुभैय्या कवडे, बळवंत कवडे, राजाभाऊ चौधरी,शिवाजी उंदरे, कृष्णा गवारे, अमोल केले, महादेव लोकरे,अहमद काझी, प्रदिप कवडे रथयात्रेचे प्रमुख प्रदिप गलांडे, सुरेश माटे, अजित केंद्रे यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.