प्रतिनिधी / वाशी
शहरात पंधरा दिवसांपासून नगरपंचायतकडून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी पाण्याअभावी शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. जॅकवेल आणि पाणी फिल्टरवरील पाणीउपसा करणारे विद्युपपंप जळणे नित्याचेच झाल्याने शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नगरपंचायतकडून दोन नवीन विद्युतपंप आरसोली साठवण तलावावरील जॅकवेल आणि हिवरा येथील पाणी फिल्टरवर बसविण्यात आले आहेत. या विद्युत पंपाची क्षमता अनुक्रमे १०० व ७५ एचपी एवढी असणार आहे. जुन्या दोन विद्युतपंपाचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत होण्याची वाशीकरांना आशा आहे.
पंचवीस वर्षापूर्वी वाशी शहराला आरसोली साठवण तलावातून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. व फिल्टर येथील पॅनल बोर्ड, व्हॉल्व , विद्युतपंप यासह इतर यंत्रणा व पाणीपुरवठा पाईप लाईन ही आता कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे मोटर जळणे, पाईप लाईन फुटणे,असे प्रकार घडत असून, त्याचा परिणाम सुरळीत पाणीपुरवठ्यावर होत आहे. जॅकवेल आणि फिल्टरवरील पॅनल बोर्डसह विद्युत पंप आणि इतर यंत्रणा नवीन बसविण्यात आल्याने मोटर जळण्याचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे.
नवीन विद्युतपंप बसले, पाईप लाईनचा प्रश्न कायम
नवीन विद्युतपंप बसल्यामुळे पंपाची पाणी पुरवठा क्षमता जादा आहे. परिणामी उच्च दाबाने पाणीपुरवठा होणार असून, जीर्ण झालेली पाईप लाईन तो दाब सहन करेल का,असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
स्वच्छ पाणी मिळण्याची आशा
शहराला पिवळसर दूषित पाणी मिळत होते त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्यही धोक्यात आले होते. मागील पाच दिवसांपासून फिल्टर, जॅकवेल आणि पाणी टाकी यांची साफसफाई करण्यात आली असून, आता तरी स्वच्छ पाणी पुरवठा मिळेल अशी आशा आहे.
लवकरच पाणी पुरवठा सुरळीत
शहर पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल आणि फिल्टरवरील विद्युतपंप जुने झाले होते. पंपाची पाणी उपसण्याची क्षमता कमी झाल्यामुळे डिस्चार्ज कमी मिळत होता. तसेच मोटर जळण्याचे प्रमाण वाढले होते. परिणामी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यावर परिणाम होत होता. येणाऱ्या काळात शहराला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.
– सुरेश कवडे, उपनगराध्यक्ष,नगरपंचायत,वाशी