व्यापारी संघ सहकार्य करणार, जनावरे घेऊन येण्याचे पशुपालकांना आवाहन
प्रतिनिधी / वाशी
मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार सोमवारपासून (दि.२४) पुन्हा सुरु होत आहे. बाजार समितीच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हौद, जनावरांचे शेड यासह इतर मुलभूत सुविधाही बाजार समिती प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांच्या दाखला फीस शेळी-मेंढी १० रुपये ,मोठी जनावरे ५० रुपये प्रति नग दाखला नोंदणी फीस आकारली जाणार आहे. तालुक्यासह परिसरातील व्यापारी शेतकऱ्यांनी आपली जनावरे बाजारात घेऊन येण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका व्यापारी संघ सहकार्य करणार
बाजार समितीने जनावरांचा बाजार पुन्हा सुरु करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, जनावरांचा बाजार सुरळीतपणे चालू राहण्यासाठी तालुका व्यापारी संघाचे सर्वतोपरी सहकार्य आहे, असे व्यापारी संघाचे पदाधिकारी सूर्यकांत मोळवणे यांनी सांगितले.