वाशीमध्ये सोयीसुविधांवर पशुपालक व व्यापारी समाधानी, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
प्रतिनिधी / वाशी
मागील काही वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार सोमवारपासून (दि. २४) पुन्हा सुरु झाला. पहिल्याच दिवशी बाजारात चार लाख रुपयांची उलाढाल झाली. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
नव्याने सुरू झालेल्या बाजाराला पहिल्याच दिवशी तालुक्यासह नेकणुर, वालवड, सालेगाव येथील पशुपालक शेतकरी व व्यापारी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच गाय, बैल,म्हैस, शेळी अशी जनावरे घेऊन पशुपालक बाजार तळावर दाखल झाले होते. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत चेडे, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, सभापती रणजित गायकवाड, उपसभापती तात्यासाहेब गायकवाड, संचालक विकास मोळवणे, शशिकांत मोरे, शामराव शिंदे, अभिजित जगताप, नितीनशेठ बीक्कड , पांडुरंग घुले यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजाराला गतवैभव
बाजार समितीच्या आवारात बाजार समितीच्या वतीने चारा, पाणी याची सोय व कमी केलेली दाखला नोंदणी फी, यामुळे व्यापाऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात आले. अशाच सोयीसुविधा कायम उपलब्ध करून दिल्यास बाजाराला नक्कीच गतवैभव मिळेल, असा विश्वास आहे.
–श्रीकांत मोरे, व्यापारी