विक्रांत उंदरे / वाशी
जून महिन्यातील पावसाच्या प्रतीक्षेनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत १३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली होती. कृषी विभागाच्या नोंदीनुसार १० जुलैपर्यंत तालुक्यातील एकूण खरीप पेरणी क्षेत्रापैकी ४७.६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जूनमध्ये पावसाअभावी पेरणीला झालेला उशीर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेला चांगला पाऊस, यामुळे शेतकऱ्यानी पेरणीची लगबग सुरू केली. तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला असून १८३२२ हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत सोयाबीन पेरणी झाली आहे. उडीद , मुग या कडधान्याचा अत्यल्प पेरा असून प्रत्येकी ३२ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरा झाला आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिके उगवून आली असून आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
तर उर्वरित भागात शेतकरी पेरणीसाठी दमदार पावसाची वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून आहे.
जनजागृती करणार
पेरणी योग्य पाऊस झाला आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांनी जमिनीतील पेरणी योग्य ओलीची खात्री करूनच पेरणी करावी. तसेच शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने त्यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात. जनजागृतीसाठी चित्ररथ करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालय येथे साधावा.
– आर.डी.बर्वे, तालुका कृषी अधिकारी