प्रतिनिधी / धाराशिव
तालुक्यातील वाणेवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या बाल वारकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या काका महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी वाखरवाडी येथील गावकऱ्यांनी चूल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी गावात ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
वाखरवाडी येथील प्रेम शिंदे या पंधरा वर्षे मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी अटक होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाखरवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून दिला आहे. वाणेवाडीच्या ( ता. धाराशिव) वारकरी संस्थेत वाखरवाडी येथील प्रेम लहू शिंदे हा विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेत होता. ५ ऑगस्ट रोजी प्रेम शिंदे या मुलाचा संशयास्पद रित्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. याप्रकरणी मुलाचे वडील लहू शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन संशयित आरोपींना ढोकी पोलिसांनी अटक केली.मात्र, काका उंबरे महाराज व माऊली महाराज हे दोघे अद्याप फरार असून ढोकी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान मयत प्रेम शिंदे याला मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचे व्रण संपूर्ण शरीरावर उमटले होते. सदर प्रकरणानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटत असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा तसेच मुख्य आरोपींना दोन दिवसांत अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत प्रारंभी मयत प्रेम शिंदे यास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामसभेत ग्रामस्थांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली.आरोपींना तातडीने अटक नाही झाल्यास संपूर्ण गाव चुलबंद आंदोलन करून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.