लोकनेते भाई उद्धवरावदादा पाटील यांची आज जयंती.. त्यानिमित्त दादांच्या जीवनावर आधारित लेख.
—————————-
डॉ. श्रीमंत कोकाटे
—————————-
आपल्या अभ्यासू, निर्भीड, प्रामाणिक आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारे भाई उद्धवराव पाटील यांचा जन्म 30 जानेवारी 1920 रोजी बार्शी तालुक्यातील माणकेश्वर येथे झाला. त्यांचे गाव इर्ले, तर त्यांचे शिक्षण तुळजापूर- धाराशिव (उस्मानाबाद) या ठिकाणी झाले.
बालवयापासूनच ते अन्यायाविरुद्ध लढत होते. निजामी राजवटीतील रझाकारांच्या अन्यायाविरुद्ध ते लढले. सावकारशाहीविरुद्ध ते लढले. सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे भक्षण करणाराना जनतेचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार नाही, ही त्यांची राजनैतिक भूमिका होती. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी यांना अधिकार मिळावेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला.
भूदान चळवळीच्या वेळेस नापीक जमिनीचे दान करणे, हा ढोंगीपणा आहे हे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले. ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि लोकनेते होते. त्यांनी हैदराबाद राज्यात सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व केले. हैदराबाद मुक्ती आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष वाढविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.
ते शेतकरी कामगार पक्षाचे तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार होते. त्यांनी विधिमंडळात आणि संसदेत अभ्यासपूर्ण पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आवाज उठविला. मोफत शिक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला. भाई उद्धवराव पाटील हे अत्यंत प्रेमळ तितकेच कर्तव्यकठोर होते. ते अत्यंत नम्र होते तितकेच ते स्वाभिमानी होते. ते जितके शांत होते तितकेच ते अन्यायाविरुद्ध वादळासारखे आवाज उठवायचे.
भाई उद्धवराव पाटील हे तत्त्वनिष्ठ राजकारणी होते. राजसत्ता ही धनसंपत्ती कमविण्याचे माध्यम नाही तर ते लोकसेवेचे व्रत आहे. हे त्यांचे राजकीय विचार होते. त्यांनी जनतेला व राज्याला ओरबाडले नाही, तर संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले. ते मुख्यमंत्री होणार होते, परंतु भांडवली आणि नवसरंजामी टोळक्याने ते होऊ दिले नाही.
त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाचे होते. त्यांनी सत्तेचा कधी बडेजाव केला नाही. त्यांच्याकडे अहंकार नव्हता. जनमानसात संवेदनशील, लोकप्रिय लोकनेता ही त्यांची खरी ओळख आहे. ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्राला न लाभलेला एक कर्तृत्ववान, संवेदनशील, अभ्यासू मुख्यमंत्री म्हणजे भाई उद्धवराव पाटील होत.
त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-डॉ.श्रीमंत कोकाटे,
विचारवंत,लेखक आणि व्याख्याते.