महाराजांचा आणि आमचा घनिष्ठ संबध भांडारकर प्रकरणानंतर आला. मराठा इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या बाबी लक्षात आल्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी, क्रीडा मार्गर्शक पुरस्कारातून त्याचे नाव हटविण्यासाठी, पुरदरेंना “महाराष्ट्र भूषण” देवू नये, यासाठी त्यांनी शासनाला पत्र दिले.
इयत्ता चौथीचे तत्कालीन “शिवछत्रपती” या पुस्तकामध्ये अनेक गंभीर चुका होत्या, हे ज्या वेळेस महाराजांच्या लक्षात आणून दिले, तेव्हा महाराजांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना समक्ष बसून सर्व बाबी सांगितल्या, त्यानंतर शिक्षण मंत्री नामदार वसंत पुरके यांनी शिवछत्रपती हे पुस्तक दुरुस्त करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
आपला वैभवशाली वारसा जतन करण्यासाठी छत्रपती उदनराजे सतत भूमिका घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, यासाठी त्यांनी “जागर शिवसन्मानाचा” ही मोहीम राबविली.
त्यासाठी त्यांनी रायगडावर जाऊन आपली भूमिका मांडली. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना भेटून राज्यपाल हटविण्याची मागणी केली. यासाठी महाराजांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही, संपूर्ण महाराष्ट्र महाराजांच्या सोबत राहिला.
खासदार छत्रपती उदयनराजे महाराज हे सर्व जाती धर्मियांना अत्यंत प्रेमाने वागवतात. काम करताना ते कोणताही भेदभाव ठेवत नाहीत. मराठा आरक्षणासाठी ते निर्भीडपणे भूमिका घेतात. सर्व जातीधर्मियांना आपण आधार दिला पाहिजे, ही त्यांची भूमिका असते.
त्यांचा जिवलग मित्र परिवार सर्व जाती धर्मातील आहे. इतर समाजाप्रमाने गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची न्याय्य भूमिका आहे.
कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर ते त्याच्या मदतीला धावून जातात. त्यांना अन्याय सहन होत नाही. अन्यायग्रस्त व्यक्ती कोणत्याही जातीचा, धर्माचा, राजकीय पक्षाचा असला तरी त्याला ते तत्काळ मदत करतात. महिलांना त्रास देणारा एखादा गुंड असेल तर त्याचा बंदोबस्त महाराज तत्काळ करतात.
अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करतात. असेच एकदा सकाळी महाराज महाबळेश्वरवरून साताराकडे येत असताना समोर एक अपघात झाला होता. तेथे बघ्यांची गर्दी होती. महाराज तत्काळ खाली उतरले. महाराजांनी ते पाहिले. जखमी व्यक्तीला तत्काळ शासकीय रुग्णालयात आणले. त्याला जीवदान दिले.असे अनेक प्रसंग आहेत.
कठीण प्रसंगी महाराज साहेब पाठीशी असतात. महाराज साहेब सर्वांचा आधारस्तंभ आहेत. महाराज साहेब स्पष्ट वक्ते आहेत.
एखादी भूमिका घेताना ते मागेपुढे पाहत नाहीत. ते निर्भीड आहेत, ते स्वाभिमानी आहेत. त्यांना नियमित अनेक लोक भेटतात. ते सर्वांचे मत ऐकून घेतात. ते प्रागतिक विचारांचे आहेत. ते उच्च शिक्षित आहेत.
निपाणी या ठिकाणच्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी मी प्रमुख वक्ता होतो, तर छत्रपती उदयनराजे महाराज हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळेस माझ्याकडे चार चाकी गाडी नव्हती, महाराज म्हणाले “तुम्ही साताऱ्यात या आपण एकत्र निपाणीला जाऊ” मी पहाटेच एसटीने सातारला गेलो आणि तेथून महाराजांच्या सोबत पुढे निपाणीला गेलो, तेव्हा महाराजांना समजले कि मी एसटीने आलो आहे.
महाराजांनी मला त्यांच्याकडील एक चार चाकी गाडी घेण्याचा आग्रह केला, परंतु मी नम्रतापूर्वक नाकारला. असे महाराज जीवापाड प्रेम करणारे आहेत.
खा.छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांनी मला त्यांच्या संग्रहातील तलवार भेट दिली आहे. याप्रसंगी महाराज साहेब म्हणाले की “मी पहातोय तुम्ही अनेक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे सेवा करत आहात. यासाठी ही तलवार भेट”. शिवाजी महाराजांची सेवा करणे ही आपली जबाबदारी आणि परमभाग्य आहे. साक्षात छत्रपतींनी तलवार भेट दिली, अजून काय बक्षीस पाहिजे? खूप आनंद वाटला.
छत्रपतींनी दिलेल्या तलवारीचा सन्मान राखणे आणि अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी वाढली, हे मात्र निश्चित!
छत्रपती उदयनराजे महाराज यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांचा राजकीय क्षेत्राचा तर अभ्यास आहेच, परंतु अर्थशास्त्राचा देखील दांडगा अभ्यास आहे. केवळ भारतीय राजकारण नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, जीडीपी याचा त्यांच्याकडे अद्यावत अभ्यास आहे. त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात येते की ते खूप अभ्यासू नेते आहेत. आज २४ फेब्रुवारी रोजी महाराजांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
–डॉ श्रीमंत कोकाटे, शिवव्याख्याते,