चैतन्यमय वातावरण,दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली
सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर; महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने, उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो, असा उद्घोष करत मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते, मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह देवीचे महंत, पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली.मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली आहे.कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारपासून (दि.3) आरंभ झाला. मंचकी निद्रा संपवून गुरूवारी पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांनतर महाभिषेकानंतर आरती करण्यात आली. त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते व मानकरी,विश्वस्त, पुजारी, भाविकांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवीच्या मुख्य गाभाऱ्यासमोर घटस्थापना करण्यात आली.त्यानंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.मंदिर परिसरात यानिमित्ताने चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली असून,मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.तसेच फुलांची आरास करण्यात आली आहे.स्वतंत्र दर्शन मंडप
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान महाराष्ट्र, आंध्र,कर्नाटकासह देशभरातून लाखो भाविक तुळजापूरला येत असतात. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गे मंदिरात प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी कार पार्किंग येथे 25 हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. नवरात्रोत्वसाच्या पार्श्वभूमीवर भवानीज्योत नेण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळानी दोन दिवसांपासून गर्दी केली होती. अनेक गावातून तरूण कार्यकर्ते या उत्सवासाठी तुळजाईनगरीत दाखल झाले होते. ढोल, ताशा, हलगीच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठ गजबजून गेली आहे. बाजारपेठेत भाविकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. हळदी-कुंकूसह प्रासादिक भांडार, उपहारगृहे भाविकांनी गजबजली आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भाविकांची गर्दी वाढण्याचा अंदाज असून, त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाला वाटतो.दरम्यान, यासाठी मंदिर प्रशासनाने जोरदार तयार केली आहे.तुळजापुरात कचऱ्याची समस्या कायम
शारदीय नवरात्रौत्सवासारखा महत्वाचा उत्सव असताना तुळजापूर नगरीत अनेक ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. शहरातील अनेक भागात कचरा साचला असून, पालिकेने स्वच्छता न केल्याने भाविकातून नाराजीचा सूर निघत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील या समस्येबद्दल पालिकेला तातडीने निर्देश द्यावेत,अशी मागणी होत आहे.
(सर्व छायाचित्रे; आरिफ शेख)