प्रतिनिधी / तुळजापूर
महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाच्या वतीने
सातारा येथे २० व्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत लातूर विभागाने नेत्रदीपक कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह चार रजत आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.
१५ ते १८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य क्रिडा विभाग आणि सातारा जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यातील १२ विभागातील संघ सहभागी झाले होते.
यात लातूर विभागाकडून खेळताना १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरी स्पर्धेत यश हुंडेकरी याने रजत पदक तर कृष्णा थिटे याने कांस्यपदक पटकावले. मुलांच्या दुहेरी स्पर्धेत यश हुंडेकरी व कृष्णा थिटे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
तसेच मुलांच्या सांघीक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या संघात यश हुंडेकरी, कृष्णा थिटे, विश्व गंगणे यांची सहभाग होता.
१७ वर्षाखालील मुलींच्या एकेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकरने रजत पदक पटकावले. तसेच मुलींच्या सांघीक
स्पर्धेत लातूर विभागाने रजतपदक प्राप्त केले. या संघात प्रियांका किरण हंगरगेकर, श्रेया राजेंद्र पाटील, सृष्टी नागनाथ मुळुक यांचा सहभाग होता.
मुलांच्या १४ वर्षाखालील संघाने कांस्यपदकाची कमाई केली. या संघात समर्थ शिंदे, प्रथमेश अमृतराव यांचा सहभाग होता.
१४ वर्षाखालील मुलींच्या संघाने सांघीक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या संघात इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, शुभांगी नन्नवरे यांचा सहभाग होता.
तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या दुहेरी स्पर्धेत इश्वरी गंगणे आणि गार्गी पलंगे यांनी रजतपदक प्राप्त केले.
मुलांच्या १९ वर्षाखालील गटात स्वराज देशमुख याने कांस्यपदक तसेच दुहेरीमध्ये स्वराज देशमुख व सुयश आडे यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
या स्पर्धेतून प्रियांका हंगरगेकर, यशराज हुंडेकरी, कृष्णा थिटे, व स्वराज देशमुख यांची छत्तीसगड येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.
सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे, प्रशिक्षक राहुल जाधव, प्रा. संभाजी भोसले, प्राचार्च राजेश जगताप यांनी अभिनंदन केले.