आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मंगळवारी (दि.१५) कोर्टात दहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते. त्यानंतर ६० दिवसांनी हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या दोषारोपपत्रात अनेक गंभीर बाबींचा उल्लेख आहे. आरोपींचे जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, सिडीआर यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच यामध्ये अटक केलेल्या आरोपींच्या संपत्तीची देखील त्यात सविस्तर माहिती आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुंबई, सोलापूर आणि पुण्याचे धागेदोरे आतापर्यंत मिळाले आहेत. दोषारोपपत्रात एकूण ३६ आरोपींचा उल्लेख आहे.
परंतु, कालपर्यंत यामध्ये ३५ आरोपींचा समावेश होता. दोषारोपपत्रात एक आरोपी वाढला आहे. तसेच याप्रकरणी एकूण ८० लोकांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणातील १४ आरोपी अटकेत आहेत तर २१ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मागील तीन आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक केलेली नाही.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि तामलवाडीचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत असून ड्रग्ज प्रकरणी तुळजापूरचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे