प्रतिनिधी / तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.१५ तारखेला दुपारी घटस्थापनेने उत्सवास प्रारंभ होत आहे.यानिमित्ताने तुळजापुरात मंदिर संस्थानच्या वतीने तयारी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात उत्सव काळात करावयाच्या उपाययोजना आणि अडचणींवर चर्चा करण्यात आली.
तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव हा शारदीय नवरात्र महोत्सव असतो.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन पोर्णिमा या १५ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण राज्यातील भाविकांची याकाळात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी होते. नवरात्रात दररोज रात्री छबीना मिरवणूक आणि अलंकार पुजा भाविकांसाठी पर्वणी असते.
शारदीय नवरात्रोत्सवातील कार्यक्रम पत्रिका
६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल.१५ ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता घटस्थापना, रात्री छबिना होईल.१६ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पुजा व रात्री छबिना, १७ ऑक्टोबरला नित्योपचार पुजा व रात्री छबिना,१८ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापुजा व रात्री छबिना,१९ ऑक्टोबर रोजी ललीता पंचमी, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबिना,२० ऑक्टोबरला शेषशाही अलंकार महापुजा,२१ ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबिना, २२ ऑक्टोबरला महिषासूर मर्दीनी अलंकार महापुजा व रात्री छबिना, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होमावरील धार्मिक विधी, घटोत्थापन, रात्री पलंग पालखीची मिरवणूक, २४ ऑक्टोबरला विजयादशमी, पहाटे देवीजींचे सीमोलंघन व मंचकी निद्रा, २८ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा, चंद्रग्रहण,२९ ऑक्टोबरला पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना,३० ऑक्टोबर रोजी नित्योपचार पुजा, रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना.