सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
तेर: धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथे तेरणा नदीच्या पात्रात पाण्यात पाय घसरून पडलेल्या रोहीत साबळे या मित्राला वाचवण्यासाठी नदीत उडी मारलेल्या अशोक इंगळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तब्बल 18 तासांनी अशोक याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाला आढळून आला.
रामवाडी येथील रोहीत सुखदेव साबळे (वय १७) हा तेरणा नदीत पोहोण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेला होता.
परंतु पाय घसरून तो नदीत बुडाला. त्याला वाचवण्यासाठी अशोक रामभाऊ इंगळे (वय २५) याने नदीत उडी मारली.
त्यानंतर गावातीलच लहू वाघमोडे यांनीही मदतीसाठी नदीत उडी मारली व रोहीत यास पाण्याच्या प्रवाहातून बाजूला काढले.परंतू नदीच्या प्रवाह मोठा असल्याने अशोक इंगळे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. अशोक यास वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.परंतु ते निष्फळ ठरले. तर लहू वाघमोडे व रोहीत साबळे हे बाहेर सुखरूप नदीच्या काठावर आले.
अशोक इंगळे वाहून गेल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी रामवाडीत धाव घेऊन नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम राबवली. परंतु अंधार पडल्याने ही मोहीम थांबविण्यात आली.रविवारी सकाळी ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी सकाळी अशोक इंगळे यांचा मृतदेह सापडला.तर रोहित साबळे हा प्रचंड प्रमाणात घाबरलेला असल्याने त्यास तेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून धाराशिव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आले आहे.
दरम्यान तहसीलदार डॉ मृणाल जाधव ,तेरचे तलाठी प्रशांत देशमुख, रामवाडीच्या तलाठी विद्या माने,खेडचे तलाठी शरद इप्पर ढोकीचे स. पो. नि. विलास हजारे,बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर, प्रकाश तरटे, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक घटनास्थळी होते.